ट्विटरवरील टीव-टीव भोवली
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने सिनेजगतातील कलाकारांचे ड्रग्ज माफियांशी असलेले संबंध तसेच शिवसेना नेत्यांशी घेतलेला पंगा यामुळे आज मुंबई मनपाने कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर हातोडा घातला. त्यानंतर पुन्हा वादग्रस्त ट्विट करत कंगनाने पाडलेल्या बांधकामाचे फोटो व्हायरल करत त्यास ‘पाकिस्तान’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात अडकली आहे. दरम्यान, कंगनाचे वकिल रिझवान सिद्दीकी हे कारवाईच्या ठिकाणी येवून कारवाई थांबविण्याची मागणी केली. ते म्हणाले की उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून तोडण्याची कारवाईची केली. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणार्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशीर बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. तिने तिच्या लेटेस्टे ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ’मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता ‘पीओके‘ झाली आहे.’ तिच्या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या तोडफोडीचा एक फोटो ही पोस्ट केला आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले होते.. यावर आता संजय राऊत म्हणाले की, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
कंगना आज मुंबईत पोहोचणार
कंगना राणावत मंडीहून चंढीगडला पोहोचली आहे. येथून ती विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती, यानंतर मोठा वाद उफाळला होता. कंगना मुंबईत येताच शिवसेनेसह इतर अनेक पक्षांचा विरोध होणार असल्याचे निश्चित आहे. केंद्राने त्यांना वाय श्रेणी सुरक्षा दिली आहे, या दरम्यान 11 सुरक्षा कर्मचारी नेहमी त्यांच्या सोबत असतील. दरम्यान, मुंबई करणी सेना आणि रामदास आठवले यांच्या पक्षाच्या आरपीआयनेही तिला संरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
मंगळवारी कंगनाचा कोरोना रिपोर्टचा कोणताच अहवाल आला नव्हता, यामुळे मंडीत आरोग्य विभागाला तिचे पुन्हा सँपल घ्यावे लागले. बुधवारी कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर कंगना मुंबईसाठी रवाना होऊ शकली. दरम्यान, ‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगना ट्विटमध्ये म्हणाली, मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंडीगड हॉस्टेलला गेले आणि मग दिल्लीत राहिले. 16 व्या वर्षी जेव्हा मुंबईत आले तेव्हा काही मित्रांनी सांगितले की, मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी प्रेम करते. यानंतर आम्ही सर्व मुंबादेवीच्या दर्शनाला गेलो. माझे सर्व मित्र परत गेले आणि मुंबादेवीने मला स्वतः जवळच ठेवले.
मुंबईत आल्यावर होऊ शकते क्वारंटाईन
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोना गाइडलाइन्सनुसार कंगनाला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन व्हावे लागेल. मात्र कंगनाने 7 दिवसांत परत जाण्याचे तिकीट दाखवले तर तिला यापासून सूट मिळेल. दरम्यान तिच्या बंगल्याच्या बेकायदा बांधकामाला तोडण्याच तयारी सुरू आहे.